19/12/2012

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

मराठी संकेतस्थळांना प्रोत्साहन देण्याकरता मराठी विकास संस्थेने संकेतस्थळांची स्पर्धा आयोजित केली आहे . ही स्पर्धा यावर्षी शासकीय संकेतस्थळे आणि इतर संकेतस्थळे अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे ह्या गटांनुसार पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील.

 शासकीय संकेतस्थळे
पारितोषिक          रुपये      
पहिले                  १५,०००
दुसरे                    १०,०००      
तिसरे                  ५,०००                      

इतर संकेतस्थळे 
पारितोषिक          रुपये      
पहिले                  ३५,०००
दुसरे                    २०,०००         
तिसरे                  १५,०००

दि. १८/१२/२०१२ पासून दि. १८/०१/२०१३ ह्या कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्ण भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे.

संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डडर्स), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावतपणा, वापरकर्त्यांना सहभागाची सोय (इण्टरअ‍ॅक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे नियम आणि अटी पुढीलप्रमाणे असतील.

०१. ही स्पर्धा मराठी संकेतस्थळांची आहे. स्पर्धेत सहभागासाठी नोंदवण्यात येणारे संकेतस्थळ हे मुख्यत्वे मराठी भाषेत असावे. ते बहुभाषिक असल्यास त्यात मराठीभाषेतील माहिती ही इतर भाषांतील माहितीच्या समप्रमाणात असावी. मराठीत मजकूर नसलेल्या संकेतस्थळांचा ह्या स्पर्धेत समावेश होणार नाही.

०२. ह्या स्पर्धेत अनुदिन्या (ब्लॉग), चर्चापीठे (फोरम्) ह्यांचा समावेश करण्यात येणार नाही.

०३. स्पर्धेच्या प्रवेशअर्जातील मागितलेली संपूर्ण माहिती भरण्यात यावी. अपुरी माहिती असलेल्या संकेतस्थळांचा समावेश स्पर्धेत करण्यात येणार नाही.

०४. राज्य-मराठी-विकास-संस्थेच्या वतीने ह्यापूर्वी २००६, २०१० आणि २०१२ ह्या वर्षांत संकेतस्थळाची स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत पुरस्कार मिळालेल्या संकेतस्थळांना ह्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

०५. संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डर्ड्स्), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, संकेतस्थळावरील सामग्रीची उपयुक्तता, अद्ययावतता, वापरकर्त्यांच्या सहभागाची सोय, माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा इ. निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

 ०६. युनिकोड संकेतप्रणाली वापरून तयार केलेल्या संकेतस्थळांना स्पर्धेत प्राधान्य देण्यात येईल. ०७. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

नोंदणीसाठी प्रवेशअर्ज येथे बघा

स्रोत : मराठी विकास संस्था





No comments:

Post a Comment